Tiranga Times Maharashtra
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपदासाठी दावा केला जात असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा करत एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एकनाथ शिंदे यांना फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. महापौर हा महायुतीचाच होणार असेल, तर मग सौदेबाजी कशासाठी सुरू आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, मुंबई महापौरपद हे प्रत्यक्षात अधिकाराचे नाही तर केवळ शोभेचे पद आहे. परदेशातील महापौरांकडे मोठे अधिकार असतात, मात्र आपल्या देशात महापौरांकडे फारसे अधिकार नसतात. त्यामुळेच काही लोकांचा खरा डोळा स्थायी समितीवर असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थायी समितीमध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तिथे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. “ब्लॅकमेलिंग करून नगरसेवक फोडण्याचा प्रकार सुरू आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, केडीएमसीमधील ठाकरे गटाचे दोन नगरसेवक सध्या संपर्काबाहेर असल्याची बाब त्यांनी मान्य केली. मात्र या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
